अतुल कुलकर्णी ग्लॅमरस दुनियेत असूनही कलेचं आणि सामाजिक भान राखणारा कलावंत. त्यानं साताऱ्याजवळच्या एका गावात ओसाड असलेली जमीन घेतली आणि तिथं जंगल फुलवलंय. तिथली 'इको सिस्टीम' जपली आहे. यशाच्या शिखरावर असतानाही सामाजिक जाणिवा जिवंत असल्याचं यापेक्षा दुसरं चांगलं उदाहरण कोणतं असेल! साताराजवळच्या वानकुसवडे गावातील तब्बल २४ एकर ओसाड जागा नैसगिर्क पद्धतीनं हरित करण्याचं काम त्यानं हाती घेतलंय.
याबाबत अतुल 'मटा'ला सांगतो, 'खूप पूर्वी मी कुर्ग इथं चक्क जंगल डेव्हलप करणाऱ्या एका फॅमिलीबद्दल वाचलं होतं. निसर्गाच्या संवर्धनासाठी केवळ सरकारवर विसंबून न राहता आपणही जमेल तितके प्रयत्न करू या अशा हेतूनं त्यांनी स्वबळावर वनीकरणाचे प्रयत्न सुरू केले होते. त्यांच्या या प्रयत्नांनी मलाही इनस्पायर केलं. उगाच लोणावळा-खंडाळ्यात जमीन विकत घेण्यापेक्षा आपणही असंच काही तरी करावं, असं मला वाटू लागलं. त्यातूनच जमीन घ्यायचं ठरवलं.'
अतुल, त्याची तीन आतेभावंडं आणि मित्रांनी मिळून वानकुसवड्यात २४ एकर जागा विकत घेतली. पुण्यात 'ओकियॉस' या संस्थेकडे रिस्टोरेशनसाठी दिली. केतकी घाटे आणि मानसी करंदीकर या दोघी ही संस्था चालवतात. जमिनीचं, तिथल्या निसर्गचक्राचं निरीक्षण करून तिचं परत पुनरुज्जीवन करण्याचं महत्त्वाचं काम या दोघी करतात. २००४ मध्ये त्यानं ही जमीन विकत घेतली, तेव्हा तिथे अक्षरश: साधं गवतही नव्हतं. पूर्णत: कोरडी आणि धूप झालेली ती जमीन होती.
अतुल म्हणाला, 'या जमिनीचं काम सुरू केलं खरं; पण ते डोळ्यांना दिसेपर्यंत बराच कालावधी जावा लागला. आता कुठे म्हणजे तब्बल सहा वर्षांनतर तिथं हिरवाई दिसू लागलीय. खूपच पेशन्सचं काम आहे हे. तिथली 'इको सिस्टीम' नैसगिर्क रीतीनं रिस्टोअर करण्याचं काम अर्थातच झट की पट होण्यातलं नव्हतं. आताशा चांगली परिस्थिती आहे. हजार-बाराशे झाडं लावली आहेत. एक छोटं घरही बांधलं आहे.' कामाच्या स्वरूपामुळे अतुलला तिकडं सतत जाणं जमत नाही; पण तीन-चार महिन्यांतून एकदा तरी तिकडं जायला त्याला आवडतं. 'या जागी घनदाट जंगल व्हायला कित्येक वर्षं जावी लागतील. त्याचा फायदा आपल्याला नाही, तर किमान पुढच्या जनरेशनला तरी होईलच. एरवी आपण प्रत्यक्ष झाडं तोडत नसलो, तरी कुठं ना कुठंतरी त्यांच्या तोडीस जबाबदार असतोच. त्यामुळे काही जणांनी एकत्र येऊन स्वत:च अशा प्रकारे वनीकरण करण्याचं हे मॉडेल विकसित व्हावं, असं मला वाटतं. मुख्य म्हणजे ते नक्कीच मॅनेजेबल आहे.'
.... करामत 'ओकियॉस'ची
ओकियॉस वेब-साईटला भेट द्या
![]() |
Ketaki Ghate n Manasi Karandikar |
सर्वांच्या प्रयत्नांना यश यायला चार वर्षे जावी लागली. एके काळी ज्या जागेत गवतही नव्हतं, तिथं आता बऱ्यापैकी हिरवाई दिसू लागली आहे. पक्षीही येऊ लागले आहेत, जे 'इको सिस्टीम' सुधारत असल्याचा इंडिकेटर आहेत. अजूनही झाडं, स्थानिक वनस्पती, गवत, औषधी वनस्पती, सुपीक माती अशी परिपूर्ण इको सिस्टीम तयार व्हायला किमान वीस वर्षे जावी लागतील. अशा प्रकारच्या रिस्टोरेशनची पश्चिम घाटांना खूप गरज असल्याचं मत केतकी-मानसीनं व्यक्त केलं.
कीर्ती परचुरे । पुणे
No comments:
Post a Comment