'तुझ्या टपोऱ्या डोळ्यात माझं इवलसं गाव’ या अल्बमचं प्रकाशन सुरेश वाडकर आणि स्वानंद किरकिरे यांच्या हस्ते झालं. या अल्बममध्ये एकच गाणे असून ते २१ कडव्यांचे आणि तब्बल ३६ मिनिटांचे आहे. या गाण्याचे संगीत दिग्दर्शन आणि गायन मिलिंद इंगळे यांनी केले आहे.
या गाण्याबद्दल माहिती देताना मिलिंद इंगळे म्हणाले की, ‘सांज गारवा’नंतर मी एकही अल्बम केला नव्हता. काही तरी वेगळे करण्याची इच्छा होती. नागपूर येथील कवी ज्ञानेश वाकूडकर यांच्या कवितांचे ‘सखी सजणी’ हे पुस्तक हाती आले. त्यातून आठ वेगळी गाणी करणे शक्यच नव्हते. मग त्यातील मला आवडलेल्या २१ कडव्यांचे गाणे तयार करण्याचे ठरविले. प्रत्येक कडव्यात प्रियकराने आपल्या प्रेयसीचे वर्णन केलेले आहे. त्यामुळे एक सलग गाणे करायचे ठरवले. त्यातून हे २१ कडव्यांचे आणि ३६ मिनिटांचे गाणे तयार झाले.
एवढे सलग गाणे ऐकण्याची श्रोत्यांना सवय नसते. त्यामुळे या प्रयोगाचा ते स्वीकार करतील का?, यावर मिलिंद म्हणाले की, या गाण्यातील प्रत्येक कडव्याची चाल वेगवेगळी आहे. सामान्यपणे सीडीमधील दोन गाण्यांमध्ये असलेला काही सेकंदांचा ‘ब्लँक पॉझ’ न वापरता दोन कडव्यांना जोडणारे संगीत वापरले आहे. यात अरेबियन शैलीपासून ते लावणीपर्यंत आणि पारंपरिक भारतीय वाद्यांपासून आफ्रिकन वाद्यांपर्यंत विविध सांगीतिक प्रकारांचा वापर करण्यात आला आहे. या गाण्याच्या सीडीबरोबर त्याचे शब्द असलेली पुस्तिकाही देण्यात येणार आहे.
खासगी म्युझिक अल्बमबद्दल माहिती देताना त्याने सांगितले की, ‘गारवा’च्या सुमारे सात-आठ लाख सीडींची विक्री झाली होती. अलीकडे मात्र पायरसीमुळे या व्यवसायावर खूप परिणाम झाला आहे. त्यामुळे सध्या या उद्योगाला कॉर्पोरेट्सच्या मदतीची गरज आहे.
फोटो पहा....
No comments:
Post a Comment